मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानं मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईतील नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तर भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थकही जुहू बंगल्यावर जमा झाले आहेत. नारायण राणे यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून येत आहेत. पोलिसांनी जुहू येथे मोठा बंदोबस्त लावला असून राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
युवा सेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याला राणे समर्थकांनी विरोध केला. दोन्ही कार्यकर्ते आक्रमक असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर केला. आक्रमक शिवसैनिक नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. तर भाजपा कार्यकर्तेही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.
केंद्रात आमचीच सत्ता, बघूया शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा सूचक विधान राणेंनी केलं.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी ऐकिव माहितीच्या आधारे बोलणार नाही. मी काय सामान्य वाटलो का? मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे, असं म्हणत नारायण राणेंनी संताप व्यक्त केला. माझ्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली, त्याचं नाव घेऊन बोला, असं राणेंनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी राणेंना सांगितलं. त्यावर कोण बडगुजर? मी त्याला ओळखत नाही, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं.
काय आहे प्रकरण?
देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आह, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर दगडफेक केली. दोन दगड भिरकावणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे, अशा शब्दांत राणेंनी शिवसैनिकांचा समाचार घेतला होता.