मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांच्या विधानानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठिकठिकाणी दगडफेक, आंदोलन सुरू करण्यात आली आहे. मुंबईत युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या जुहू येथील बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसैनिकांनी एका मॉलवर दगडफेक केली आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केली. इतकचं नाही तर चिपळूणमध्ये नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा अडवण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. तर मी चिपळूणमध्ये येणारच कोण अडवा येतो बघू अशा शब्दात नारायण राणे यांनीही शिवसैनिकांना प्रतिआव्हान दिलं आहे.
नितेश राणेंना रत्नागिरीत पोलिसांनी अडवलं
कणकवलीकडून भाजपा आमदार नितेश राणे चिपळूणच्या दिशेने निघत असताना पोलिसांना त्यांना मध्येच अडवलं आहे. पोलीस कुठलीही नोटीस नसताना आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतायेत. त्यांच्याकडे लेखी नोटीस नाही. हे आम्हाला मारण्याचा प्रयत्न करणार आहेत असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जुहू येथील बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न
आमदार नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करून काही युवासेनेचे कार्यकर्ते बंगल्याबाहेर जमणार असल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना अडवावं त्यानंतर जे काही होईल त्यासाठी आम्ही जबाबदार नाही असं सांगत सिंहाच्या हद्दीत येऊ नका असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी केली. त्याठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी केली. नितेश राणे यांनी जे आव्हान दिले त्याला उत्तर म्हणून आम्ही इथं आलो. तुमच्यात हिंमत असेल तर बाहेर पडा. पोलिसांच्या आड त्यांचे कार्यकर्ते लपले होते. आमची दोन हात करण्याची तयारी आहे. उंदिर बिळात लपलेत असा टोला युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंना लगावला.
केंद्रात आमचीच सत्ता, बघूया शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा सूचक विधान राणेंनी केलं.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी ऐकिव माहितीच्या आधारे बोलणार नाही. मी काय सामान्य वाटलो का? मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे, असं म्हणत नारायण राणेंनी संताप व्यक्त केला. माझ्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली, त्याचं नाव घेऊन बोला, असं राणेंनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी राणेंना सांगितलं. त्यावर कोण बडगुजर? मी त्याला ओळखत नाही, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं.