मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्याविरोधात शिवसैनिकांनी(Shivsena) आक्रमकपणे आंदोलन केले आहे. राज्यभरात राणेंविरोधात संघर्ष पेटला असून त्याचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेने थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानं संघर्ष आणखी वाढला.
युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राणे यांच्या घराबाहेर भाजपाचे कार्यकर्तेही होते. तेव्हा दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. राणे यांच्या घराबाहेर पोलिसांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त वाढवला. परंतु यावेळी झालेल्या झटापटीत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झाले.
मनसेचे अखिल चित्रे यांनी याबाबत व्हिडीओ पोस्ट करून वरुण सरदेसाईंना सुनावलं आहे. चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वरूणजी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आभार !! वरुण सरदेसाई यांनी मुंबई पोलिसांची " हिम्मत " काढायची तुम्हाला गरज नाही, छातीवर गोळ्या खाऊन आमच्या मुंबईची रक्षा त्यांनी केली आहे, मुंबई पोलीस आम्ही तरी हे कधी विसरणार नाही अशा शब्दात मनसेने युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंवर निशाणा साधला आहे.
थेट राणे कुटुंबाला भिडणारा शिवसेनेचा नवा वाघ; कोण आहे आक्रमक चेहरा?
जे घडलं ते व्हायला नको होतं – राज ठाकरे
मुंबईतील राड्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी राज्यात जे काही सुरू आहे ते व्हायला नको होते. सर्व काही चुकीच्या पद्धतीने होत आहे, असे विधान राज ठाकरे यांनी केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे हे सध्यातरी या विषयावर अधिकृतपणे काही बोलणार नाहीत, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
"युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावं"
युवासेना कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा
आव्हान देण्याची भाषा राणेंकडून करण्यात आली होती. आपण त्यांच्या बंगल्याबाहेर जमलो, मात्र उंदिर आधीच पळून गेले होते. नारायण राणेंना अटक व्हायलाच हवी. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी कुठलाही कायदा-सुव्यवस्था हातात घ्यायचं नाही. ज्यांनी आव्हान दिलं ते आम्ही स्वीकारलं. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे. तसेच ज्या पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मारलं त्यांनाही निलंबित करण्याची मागणी वरुण सरदेसाईंनी केली आहे.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जुहू येथील बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न
आमदार नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करून काही युवासेनेचे कार्यकर्ते बंगल्याबाहेर जमणार असल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना अडवावं त्यानंतर जे काही होईल त्यासाठी आम्ही जबाबदार नाही असं सांगत सिंहाच्या हद्दीत येऊ नका असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी केली. त्याठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी केली. नितेश राणे यांनी जे आव्हान दिले त्याला उत्तर म्हणून आम्ही इथं आलो. तुमच्यात हिंमत असेल तर बाहेर पडा. पोलिसांच्या आड त्यांचे कार्यकर्ते लपले होते. आमची दोन हात करण्याची तयारी आहे. उंदिर बिळात लपलेत असा टोला युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंना लगावला.