मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत (CM Uddhav Thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काल दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते. मात्र नारायण राणे यांनी केवळ दोन शब्दांचं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नारायण राणे यांनी सध्या तरी फार बोलणं टाळत केवळ 'सत्यमेव जयते' असे दोन शब्दांचं ट्विट रात्री 12.32 च्या सुमारास केले आहे.
दरम्यान, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे.
दुसरीकडे, नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला डिवण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी याच्या एका सिनेमातील दृष्य शेअर करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.