अहमदबाद – गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, यातच पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबातील सदस्याचं नाव निवडणुकीसाठी पुढे आल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिलं, परंतु नेत्यांचे नातेवाईक, महापालिकेत ३ वेळा कार्यकाळ पूर्ण करणारे आणि ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे निकष भाजपाने लावले, त्यामुळे खुद्द पंतप्रधानांची नातलग असताना मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारण्यात आलं.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची विशेष मुलाखत बीबीसीनं प्रसिद्ध केली आहे, त्यात प्रल्हाद मोदींनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे, माझी मुलगी ओबीसींसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आमचा उदरनिर्वाह होत नाही, आम्ही सगळे मेहनत करतो, माझं किराणा मालाचं दुकान आहे, नरेंद्र मोदींनी १९७० मध्ये घर सोडलं आणि संपूर्ण देशाला स्वत:चं कुटुंब बनवलं, त्यांचा जन्म आमच्या कुटुंबातला असला तरी ते भारतमातेचे पुत्र म्हणून वाटचाल करत आहेत, मग असं पाहिलं तर कुणीच निवडणूक लढवू शकणार नाही. सारे भारतीय माझे बांधव आहेत असं नरेंद्र मोदी स्वत: म्हणतात त्यामुळे हा नियम फक्त आम्हाला कसा काय लागू होईल? असा सवाल प्रल्हाद मोदींनी व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी आमच्या कुटुंबाचा भाग आहे असं कसं म्हणता येईल?
आमच्या रेशनकार्डवर नरेंद्र मोदी यांचे नाव नाही, मगं ते आमच्या कुटुंबाचा भाग आहे असं म्हणता येईल का? एकाच रेशनकार्डावर नावं असतात ते कुटुंब असतं, केंद्र सरकारने रेशनकार्डसाठी नियम बनवले आहेत आणि ते पाळते जातात, पक्षानेही त्याचे पालन करायला हवं, सोनल मोदींनी कधी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी भेट दिलीय का? हे तपासलं तर नातं किती घट्ट आहे याची कल्पना तुम्हाला येईल. अद्याप मी पंतप्रधानांच्या घराचं दार पाहिलं नाही तर ते माझ्या मुलांना कसं माहिती असेल? ते आईला भेटतात, इतर कुटुंबीयांना दूर ठेवतात. गेल्या काही वर्षातले फोटो पाहिले तर आईव्यतिरिक्त कुणीच नाही हे लक्षात येईल असं प्रल्हाद मोदींनी सांगितले.
तसेच नरेंद्र भाई येतात तेव्हा आईला भेटतात तेव्हा घरातलं छोटं मुलंही नसतं हा अन्याय वाटत नाही का? आईसोबत बसायची परवानगी फक्त नरेंद्रभाईंना आहे, घर सोडल्यामुळे त्यांना कुटुंबाची गरज नाही असं कदाचित वाटत असावं, आमचा भाऊ देशाचा पंतप्रधान झालाय ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु त्यांच्या नावाचा वापर आम्ही कधीही काहीही मिळवण्यासाठी केला नाही आणि भविष्यातही करणार नाही
...मग जय शहाला बीसीसीआयचं सचिवपद कसं मिळालं?
पक्ष जो काही निर्णय घेते ते नेते आणि कार्यकर्ते यांना एकसारखा असतो, राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील विजय वर्गीयांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांचं क्रिकेटमध्ये कोणतंही योगदान नसताना त्यांच्याकडे बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी येते. मग याचा अर्थ पक्षाचं वागणं दुटप्पीपणाचं आहे, माझी मुलगी नरेंद्र मोदींची पुतणी आहे, म्हणून नव्हे तर आश्वासक नेता होण्याची तिची पात्रता आहे, विजयाची आशा असेल तर पक्षाने तिला तिकिट द्यायला हवी, नरेंद्र मोदींचे नातेवाईक असल्याचा आम्हाला फायदा नको असंही प्रल्हाद मोदींनी सांगितले.