शिवसेनेसोबतचा पंगा २०२४ मध्ये भाजपला महागात पडणार? बघा काय सांगतो सर्व्हे
By कुणाल गवाणकर | Published: January 24, 2021 11:48 AM2021-01-24T11:48:56+5:302021-01-24T11:53:54+5:30
२०१४ पासून १९ पक्ष एनडीएच्या बाहेर; भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता
मुंबई: कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून अनेक मित्रपक्षांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं भाजपप्रणित राष्ट्रवादी लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर सव्वा वर्षांपूर्वी शिवसेनेनं भाजपला रामराम केला. या सगळ्याचा फटका २०२४ मध्ये भाजपला बसू शकतो.
'रोखठोक : सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते'
२०१४ पासून आतापर्यंत १९ पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे. कृषी विधेयकं संसदेत मांडली गेल्यावर शिरोमणी अकाली दलानं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजस्थानमध्ये हनुमान बेनिवाल यांनी एनडीएला रामराम केला. बेनिवाल राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आहेत. २०१८ मध्ये चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पक्षानं (टीडीपी) भाजपची साथ सोडली. त्यामुळे भाजपनं दक्षिणेत मोठा मित्र गमावला.
छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडली आणि थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधात बसावं लागलं. त्यानंतर गेल्या वर्षी शिरोमणी अकाली दलानं एनडीएची साथ सोडली. अकाली दल आणि शिवसेना भाजपचे सर्वात जुने मित्र होते. या घडामोडींवर भाष्य करताना आता एनडीएमध्ये काय शिल्लक राहिलंय, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
यूपीए, एनडीए बाहेरचे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार
देशातले अनेक पक्ष काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग नाहीत. आज तक- कार्वी इनसाईट्स लिमिटेडनं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार पुढील लोकसभा निवडणुकीत यूपीए, एनडीए बाहेरच्या पक्षानं ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळू शकतात. ही आकडेवारी भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.
अन्य पक्षांना २०१ जागा मिळण्याची शक्यता
आज तक-कार्वी इनसाईट्स लिमिटेडच्या सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अन्य पक्षांना ४४ टक्के मतांसह २०१ जागा मिळू शकतील. या अन्य पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष, पीडीपी, बीजेडी, एयूडीएफ, एमआयएम, आरएलडी, आजसू. एएमएमके, अकाली दल, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, टीडीपीसह सर्व डाव्या पक्षांचा समावेश आहे.
२०१४ मध्ये शिवसेना, टीडीपीची महत्त्वाची भूमिका
२०१४ मध्ये एनडीएची सत्ता आली. त्यावेळी शिवसेना, टीडीपीनं अनुक्रमे १८ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. एनडीएनं ३८.४ टक्के मतांसह ३३६ जागांवर विजय मिळवला होता. त्यात शिवसेना, टीडीपीनं अनुक्रमे १.६ आणि २.६ टक्के मतं मिळवली होती. अकाली दलानं ४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेनं २.१ टक्के मतांसह १६ जागा जिंकल्या. या निवडणुकीत टीपीडी भाजपसोबत नव्हती. पण टीडीपीची कमतरता नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील जेडीयूनं भरून काढली. जेडीयूनं १६ जागा जिंकल्या. शिवसेना एनडीएच्या बाहेर गेल्यानं आता जेडीयू एनडीएमधील मोठा घटक पक्ष आहे.