मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता थोडाच अवधी राहिला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नावं असलेल्या काहींना महत्त्वाची खाती मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेल्या ४३ नेत्यांची यादी समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या चार नावांचा समावेश आहे. नारायण राणेंना मोदींकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मोदींनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला. त्यामुळे राणे पहिल्याच रांगेत दिसले होते. त्यामुळे राणेंना केंद्रात महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं. राणेंच्या माध्यमातून कोकणात भाजपची ताकद वाढवण्यावर मोदींनी लक्ष दिल्याचं समजतं.राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. राणे शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाची रसद देऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.कपिल पाटील यांच्या रुपात मोदी सरकारनं सोशल इंजिनीयरिंग केलं आहे. पाटील ओबीसी समाजातून येतात. सध्या राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय तापला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळत आहे. भारती पवार दिंडोरीच्या खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या जवळपास दोन लाखांच्या मताधिक्क्यानं निवडून आल्या. तर डॉ. भागवत कराड राज्यसभेचे सदस्य आहेत. संघटनात्मक पातळीवर त्यांनी पक्षासाठी उत्तम काम केलं आहे.