नवी दिल्ली – नरेंद्र मोदी कॅबिनेट विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल ९ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या विस्तारात आधीच काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
कॅबिनेट विस्तारापूर्वी थावर चंद गहलोत यांना मंत्रिमंडळातून हटवून कर्नाटकचं राज्यपाल पद देण्यात आलं. ते सामाजिक न्याय मंत्री होते. त्याशिवाय गहलोत यांच्याकडे राज्यसभा सभागृहाचं सदस्यपद आणि भाजपाच्या संसदीय मंडळाचंही पद होते.
थावरचंद गहलोत यांच्यानंतर ‘या’ मंत्र्यांचा राजीनामा
डॉ. हर्षवर्धन – केंद्रीय आरोग्य मंत्री असलेले डॉ. हर्षवर्धन यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. त्याचा फटका डॉ. हर्षवर्धन यांना बसला आहे. हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कारभारही होता. आता हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यानं २ मंत्रालय रिक्त झाले.
बाबुल सुप्रियो – पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून खासदार निवडून आलेले बाबुल सुप्रियो यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. ते पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. बाबुल सुप्रिया पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रिया यांना मैदानात उतरले होते. परंतु ५० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.
देबोश्री चौधरी – पश्चिम बंगालच्या रायगंड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले देबोश्री चौधरी यांनाही राजीनामा द्यायला सांगितला आहे. त्यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालयाचा कारभार होता. त्यांना पश्चिम बंगालमध्ये भाजपासाठी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते
रमेश पोखरियाल निशंक – उत्तराखंडच्या हरिद्वार येथून खासदार असलेले रमेश पोखरियाल निशंक यांनाही राजीनामा देण्यात सांगितले आहे. ते मानव संसाधन विकास मंत्री होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाला होता. एक महिना उपचारासाठी दवाखान्यात होते. आरोग्य निगडीत कारणामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे.
सदानंद गौडा – कर्नाटक बंगळुरू येथील सदानंद गौडा यांनीही राजीनामा दिला आहे. ते रासायनिक आणि खते उत्पादन मंत्री होते. कोरोना काळात औषधांच्या उत्पादनावरून मोदी सरकारवर टीका झाली होती. त्याचा फटका सदानंद गौडा यांना बसला आहे.
संतोष गंगवार – उत्तर प्रदेशच्या बरेली येथील खासदार संतोष गंगवार यांनाही राजीनामा द्यायला सांगितला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे होता. कोरोना काळात संतोष गंगवार यांनी लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल झालं. त्यात उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या जागी लखीमपूर येथील खासदार अजय मिश्रा यांना मंत्रिपद दिलं जात आहे.
संजय धोत्रे – महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे निवडून आले आहेत. शिक्षण विभागासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे ते राज्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संजय धोत्रे यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून हटवून पक्ष संघटनेचे काम दिले जाऊ शकते.
रतनलाल कटारिया – हरियाणातील अंबाला येथील खासदार रतन लाल कटारिया यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाचा कारभार होता. त्यांच्या जागी खासदार सुनीता दुग्गल यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
प्रताप सारंगी – ओडिशातील बालासोर येथील खासदार प्रताप सारंगी यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते सूक्ष्म, लघु व मध्यम यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.