नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल(Narendra Modi Cabinet Expansion) होणार असून बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज होणारा फेरबदल हा भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात तरूण मंत्रिमंडळ असेल. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या सरासरी वयापेक्षा सर्वात कमी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार युवांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यात पीएचडी, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट आणि प्रोफेशनल यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलात प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक भागांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. १२ ओबीसी प्रतिनिधित्व असेल. छोट्या समुदायांनाही या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. महिलांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल. प्रशासकीय अनुभव असणाऱ्या व्यक्तींचंही मंत्रिमंडळात विशेष स्थान असणार आहे. मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे.
दिल्लीला जाण्यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात पूजा केली. मागील वर्षी काँग्रेस सोडून शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपा प्रवेशामुळे मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार कोसळलं आणि भाजपा पुन्हा सत्तेत आली. आसाममध्ये माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीनंतर हेमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार झाले. त्यांचाही कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचं राज्यपाल बनवण्यात आलं. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेत त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ पर्यंत होता. त्यामुळे मंत्रिमंडळात अशा चेहऱ्याचाही समावेश होऊ शकतो जो संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नाही.
महाराष्ट्रातून कोणाची वर्णी?
राज्यातून नारायण राणे, कपिल पाटील, प्रीतम मुंडे किंवा भागवत कराड, पूनम महाजन, हिना गावित यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हिना गावित यांना अद्याप दिल्लीवरून फोन आलेला नाही. तर भागवत कराड यांना आज फोन आला आहे. भागवत कराड हे मराठवाड्यातील बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांना गेल्या वर्षी राज्यसभेवर घेण्यात आले होते. पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बंजारा समाजाचे नेते म्हणून भागवत कराड यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राज्यात सध्या मराठा आंदोलनाचा विषय तापलेला आहे. यामुळे नारायण राणे(Narayan Rane) आणि बंजारा समाजाचे नेते भागवत कराड (Bhagvat karad) यांच्या पारड्यात मंत्रिपद देवून जातीची समीकरणे बांधली जाण्याची शक्यता आहे. भागवत कराड यांना बोलावणे आल्याने प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.