- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात बुधवारी वर्णी लागली. पाटील यांना केंद्रीय राज्य मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या निकटवर्तीयांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटील यांच्या रुपाने ठाण्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
२०१४ साली कपिल पाटील हे जिल्हा बॅंकेचे चेअरमन होते. त्यावेळी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २०१४ साली कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात कपिल पाटील हे महत्वाची भूमिका बजावतील असे भाकित केले होते. कपिल पाटील यांनी आज केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आबांचे भाकीत खरे ठरले आहे. आज आबांनी वर्तविलेल्या त्या भाकिताची व्हिडीओ क्लिप देखील भिवंडीत प्रचंड व्हायरल होत आहे.
कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यामागील राजकीय गणितं काय?राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा. पाटील यांना संधी दिली गेली आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत पाटील यांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय व आर्थिक सामना करावा लागेल. पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ठाणे शहरात व अन्य काही शहरात भाजपकडे आश्वासक चेहरा नाही. पाटील ती गरज पूर्ण करतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे.ठाणे जिल्हा रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही. कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला व अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे. मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यातील सेनेच्या सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना संधी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारल्याचे बोलले जाते. जर या दोघांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाला तर सध्याच्या पुन्हा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा वावड्या असल्याचे सिद्ध होईल, असे बोलले जाते. पाटील यांनी सातत्याने शिंदे पिता-पुत्रांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.