नवी दिल्ली – बुधवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या शपथविधीत तब्बल ४३ नवे मंत्री शपथ घेतील. यात नव्या आणि जुन्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. नवीन कॅबिनेट विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातीय समीकरण ध्यानात ठेऊन नावांचा समावेश केला आहे. कॅबिनेटच्या नव्या विस्तारात २७ ओबीसी आणि २० एससी-एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध SC समाजातील आहे. १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. २७ मंत्री OBC समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री शेड्यूल ट्राईब्स(ST) समाजातील आहेत.
५ मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील आहे. यात मुस्लीम १, शिख १, बौद्ध २ आणि १ ईसाई धर्मातील आहे. त्याशिवाय २९ ब्राह्मण, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट विस्तारात ११ महिलांचा समावेश आहे. यातील २ महिलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात युवा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे. ५० वर्षापेक्षा कमी असलेल्या १४ चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यातील ६ जणांना कॅबिनेट मंत्री बनवलं जाईल. कॅबिनेट विस्तारानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ इतकं असेल.
महाराष्ट्रातील ६ नावांचा समावेश असण्याची शक्यता
नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट विस्तारात महाराष्ट्रातील ६ नेत्यांचा समावेश असल्याचं सांगितले जात आहे. यात खासदार नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित, प्रीतम मुंडे, भारती पवार यांच्या नावाचा समावेश आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, अल्पकाळातच त्यांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत भाग घेऊन पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय मतदारसंघातील प्रश्नांसोबतच राज्यस्तरीय विषय त्यांनी संसदेत हाताळले आहेत. व्यवसायाने डॉक्टर तसेच आदिवासी असल्याने त्यांच्या मंत्रिपदामुळे आदिवासी समाजात चांगला संदेश जाण्याची पक्षाला अपेक्षा आहे.
४ मंत्र्याचा राजीनामा
मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. तर दुसरे मंत्री पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडे देखील राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांच्या जागी पश्चिम बंगालच्याच नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोघांनंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौड़ा यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राज्य मंत्री संतोष गंगवार यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.