नवी दिल्ली – तामिळनाडू भाजपा अध्यक्ष एल मुरुगन(L Murugan) यांचा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश करण्यात आला. तामिळनाडूमध्ये अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं गेल्या २ दशकानंतर ४ जागा पटकण्यात यश मिळवलं आहे. एल. मुरुगन यांना याच विजयाची भेट म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आला आहे. तामिळनाडूत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मुरुगन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.
एल. मुरुगन यांना मार्च २०२० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तामिळनाडू अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. विधानसभा निवडणुका अवघ्या एक वर्षावर असताना तामिळनाडूत पक्षसंघटन वाढवण्याचं आव्हान त्यांनी उचललं. कमी काळात पक्षाला यश मिळवून दिलं. द्रविड विचारधारेशी कट्टर असणाऱ्या तामिळनाडूत हिंदुत्व विचारधारा असणाऱ्या पक्षाचे नेतृत्व करणं सोप्पं नव्हतं. अशावेळी मुरुगन यांनी सॉफ्ट द्रविड विचारधारा घेत राष्ट्रवादी विचारधाराही बळकट केली.
एल. मुरुगन यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर राजकीय विश्लेषक सुमंत रमण म्हणतात की, मुरुगन यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीमुळेच तामिळनाडूत भाजपाचे ४ आमदार निवडून आले. तर मुरुगन स्वत: विधानसभा निवडणुकीत खूप कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. तर मुरुगन हे अत्यंत सक्रीय युवा नेते आहेत. पक्षाने जेव्हा मुरुगन यांच्यावर जबाबदारी टाकली तेव्हा त्यांच्यासमोर मोठी आव्हानं होती. २० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत काम करणारे दलित नेता मुरुगन भाजपात सहभागी होण्याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी जोडले होते. संघटनात्मक कौशल्यामुळे आज ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.
धारापुरम मतदारसंघातून कमी मतांनी पराभूत
मुरुगन धारापुरम विधानसभा मतदारसंघातून १ हजार ३९३ मतांनी निवडणूक हरले आहेत. द्रमुकचा सहकारी पक्ष असताना भाजपाने २००१ मध्ये ४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अन्नाद्रमुकच्या मदतीने यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा २ दशकानंतर ४ जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यात राहणारे ४४ वर्षीय मुरुगन हे भाजपा प्रदेशाध्यक्ष बनण्यापूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष होते. आता भाजपा शासित कोणत्याही राज्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल. मानवाधिकार कायद्यात मुरुगन यांनी डॉक्टरेट घेतली आहे.