'काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी केले ब्लॅकमेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 05:47 AM2019-04-24T05:47:27+5:302019-04-24T05:48:11+5:30
राजकारणात ब्लॅकमेलर असता कामा नये व जे आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
मुंबई : देशातील अनेक पक्ष काँग्रेससोबत आघाडी करायला तयार होते. मात्र, नरेंद्र मोदींनी विविध केसेसच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले. त्यामुळे अनेक ठिकाणी आघाडी झाली नाही. इतके दिवस भाजपला विरोध करणाºया शिवसेनेने त्यांच्याशी युती का केली, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करण्याची गरज आहे. राजकारणात ब्लॅकमेलर असता कामा नये व जे आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांच्या प्रचारार्थ विक्रोळी कन्नमवार नगर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी एमआयएमचे आमदार अॅड. वारीस पठाण उपस्थित होते. वारीस पठाण म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सरकार सातत्याने करत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुस्लीम, दलितांवर सातत्याने अत्याचार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. मोदी खोटारडे आहेत. देशाची जनता त्यांच्या घोषणाबाजीला कंटाळली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने उमेदवारी दिली. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वीने केलेले वक्तव्य लांच्छनास्पद असल्याची टीका त्यांनी केली.
‘हिरानंदानीचा घोटाळा बाहेर काढू’
राहुल गांधींनी मुंबईकरांना ५५० चौ. फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, याआधी काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २७० फुटांचा खुराडा दिला, अशी टीका त्यांनी केली. हिरानंदानीने २ हजार फ्लॅटचा घोटाळा केला. त्यांना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी घातले. आमची सत्ता आल्यास हिरानंदानीने बळकावलेल्या २ हजार फ्लॅटचा घोटाळा बाहेर काढू, असे आंबेडकर म्हणाले.
‘विरोधकांकडून पैसे घ्या; मते वंचितलाच द्या’
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विरोधकांचे ‘मनी’रत्नम सुरू होईल. त्यांच्याकडून पैसे घ्या, मात्र मते वंचित बहुजन आघाडीलाच द्या, असे वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी या वेळी केले.