मुंबई - एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे आज एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला (Shiv Sena) जबरदस्त धक्का बसला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. (Mathadi Labor leader Narendra Patil leaves Shiv Sena, made serious allegations against Shiv Sena leader)
माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमिती आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेपासून फारकत घेण्याची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असा दावाही नरेंद्र पाटील यांनी केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याता निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये आले होते. मात्र २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.