साध्वी प्रज्ञा सिंह, अनंत कुमार हेगडेंनंतर आणखी एक भाजपा नेता बरळला
'गोडसेनं एकाला मारलं; राजीव गांधी 17 हजार जणांच्या मृत्यूला जबाबदार'
नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर टीका झाल्यानंतर आता भाजपाचे खासदार वादात सापडले आहेत. भाजपा खासदार नलीन कुमार कतील यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींची तुलना गोडसेशी केली आहे. 'गोडसेनं एकाला मारलं. कसाबनं 72 जणांची हत्या केली. राजीव गांधींनी 17 हजार जणांना मारलं. आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण,' असं कतील यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यावरुन कतील यांच्यावर सोशल मीडियानं जोरदार टीका केली. यानंतर लगेचच कतील यांनी ट्विट डिलीट केलं. 'माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. अनेकांनी त्यावर आक्षेप घेताच मी ट्विट हटवलं. आता यावरील चर्चा थांबवू या,' असं नवं ट्विट कतील यांनी केलं.नलीन कतील दोन वेळा भाजपाकडून लोकसभेवर गेले आहेत. दक्षिण कन्नडा मतदारसंघातून ते निवडून गेले. कतील यांच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. 'काँग्रेसच्या दरबारातली नेतेमंडळी राजीव गांधींना मिस्टर क्लीन म्हणून गाजावाजा करायची. पण नंबर भ्रष्टाचारी म्हणून त्यांचं आयुष्य संपलं,' अशा शब्दांत मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. राजीव गांधींनी आयएनएस विराटचा स्वत:च्या कुटुंबासाठी टॅक्सीसारखा वापर केला, असा दावादेखील त्यांनी केला होता.राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं काल भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर भाजपानं त्यांना माफी मागण्याची सूचना केली. यानंतर सिंह यांनी माफीदेखील मागितली. मात्र गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केलं. या प्रकरणी माफीपासून पुढे जायला हवं. आपण आता पुढे जाणार नाही, तर केव्हा जाणार?, असं ट्विट हेगडेंनी केलं.