नागपूर - ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेमध्ये विविध धर्मांचे गुरू आणि आध्यात्मिक व्यक्ती आपले विचार मांडत आहेत. दरम्यान, विविध धर्मांचे वास्तव्य असलेल्या भारताने जगाला वसुधैव कुटुंबकम म्हणजेच हे संपूर्ण जग हेच कुटुंब असल्याचा विचार दिला आहे. या विचाराचा सांभाळ आणि प्रचार प्रसार करण्याचे काम झाले पाहिजे, असं मत कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस यांनी मांडलं.
आपल्या संबोधनाला सुरुवात करताना कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस यांनी सामाजिक सौहार्दाबाबत ही परिषद घडवून आणल्याबद्दल लोकमत समुहाचे आभार मानले. ते म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीत ही परिषद होत आहे. एका विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या साथीमुळे अनेक चांगली माणसं आपल्यातून निघून गेली आहे. मात्र आता या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दिसत आहे.
कोरोनामुळे जगावर मोठं संकट आलं आहे. तर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र या काळातही मानवतेची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली. भारतामध्ये वैयक्तिक आणि सामुहिकरीत्या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. स्थलांतरीत होत असलेल्यांना मदत, आजारींना औषधे या माध्यमातून ही मदत मिळाली. या मदतीमधून मानवता दिसून आली. आता कोरोनाच्या साथीनंतरही ही बाब पुढे नेण्याची गरज आहे.
प्रत्येक धर्मामध्ये देव ही कल्पना वेगवेगळी आहे. पण मानवता, सौहार्द आणि शांतता यावर प्रत्येत धर्माचा विश्वास आहे. अनेक धर्मांचे जन्मस्थान आणि घर असलेल्या भारताने वसुधैव कुटुंबकम हे तत्त्व जगाला दिले आहे. संपूर्ण जग हेच कुटुंब आहे. असा विचार या तत्त्वामागे आहे. हा वारसा आपण सांभाळला पाहिजे. या वारशाचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी आणि धार्मिन नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस यांनी यावेळी व्यक्त केली.