- असिफ कुरणेचेन्नई : तामिळनाडूतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणे ३९ जागांवर एकाच टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होत आहे. एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक. या दोन प्रमुख द्रविडी नेत्यांच्या अनुपस्थितीत काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांना या राज्यात शिरकाव करण्याची संधी आहे. काँग्रेस राज्यात द्रमुकशी आघाडी करून ९ जागांवर लढत आहे. भाजपने अण्णा द्रमुकशी युती केली असून, भाजप ५ जागा लढवत आहे. सर्वच ठिकाणी पंचरंगी सामने असले तरी खरी लढत द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक अशीच आहे.जयललिता यांच्या अण्णा द्रमुकने २०१४ च्या निवडणुकीत देशात नरेंद्र मोदी लाट असतानाही ३९ पैकी ३७ जागा जिंकून तामिळनाडूत आपलेच राज्य असल्याचे सिद्ध केले होते. त्याआधी २००९ च्या निवडणुकीत द्रमुकने २७ जागा पटकावल्या होत्या. त्यामुळे तामिळी मतदारांना या निवडणुकीत जयललिता व करुणानिधी यांची कमतरता जाणवत आहे. त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्न करत आहेत.जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये सत्तेसाठी अनेकदा उलथापालथ झाली. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला (ज्या सध्या तुरुंगात आहेत) यांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरन यांनी बंड केले. त्यांच्यासोबत १८ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या जागांवरही आता मतदान होत आहे. या निवडणुकीत दिनकरन हा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे, हेही स्पष्ट होणार आहे. अभिनेते कमल हासन यांचा पक्षही निवडणुकीच्या राजकारणात उतरला आहे आणि येणार, येणार अशी चर्चा असलेल्या रजनीकांत यांनी मात्र तूर्त गप्प बसण्याचे ठरवले आहे.जयललिता यांच्या पश्चात त्यांची जागा घेणारे नेतृत्व अण्णा द्रमुककडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप त्याचा फायदा घेत, आपले व पक्षाचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप फक्त पाच जागा लढवत असले तरी त्यांचा डोळा अण्णा द्रमुकच्या मतदार व केडरवर आहे. द्रमुकची सारी जबाबदारी करुणानिधींचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्याकडेच आहे. त्यांना २०१४ मध्ये मिळालेला भोपळा ( शून्य जागा ) काँग्रेसच्या साथीने फोडायचा आहे. अर्थात २0१६ सालच्या विधानसभा निवडणुकांत द्रमुकने ८८ जागा जिंकून दाखवल्या होत्याच.>मोदी, राहुलची रणनीतीउत्तरेकडील राज्यांत फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊ न एनडीएला अधिकाधिक जागा मिळवण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत आहेत, तर केरळ, कर्नाटकाप्रमाणे तामिळनाडुमध्येही आपला दबदबा निर्माण करण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. त्यांनी द्रमुक नेत्यांशी उत्तम संबंध ठेवून आपले महत्त्व कायम ठेवले आहे. अर्थात द्रमुक व काँग्रेसची मैत्री जुनीच आहे.>कोणाचे किती जागांवर उमेदवार(एनडीए आघाडी )अण्णाद्रमुक - २०भाजप- ५पीएमके - ७डीएमडीके - ४तामिल मनिला काँग्रेस - १पीएनके - १पुत्तीया तामिळगम - १>युपीए आघाडीद्रमुक - २०काँग्रेस - ९माकप - २भाकप -२व्हीसीके -२आयजेके - १केएमडीके- १आययूएमएल-१एमडीएमके -१>एएमएमके आघाडी - ३७ ( टी.टी. व्ही दिनकरन यांचा पक्ष)मक्कल निधी मय्यम - ३७ (कमल हसन यांचा पक्ष ) आरपीआय - १नाम तामिळारकच्ची - ३८
प्रादेशिक पक्षांमधील लढाईमध्ये तामिळनाडूत राष्ट्रीय पक्षांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 3:44 AM