कोल्हापूर : सत्तेच्या लाटेवर स्वार होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगीराज गायकवाड यांच्यानंतर आता माजी आमदार राजीव आवळे हेही पक्षात येत आहेत. ऐन लोकसभा व विधानसभेच्या तोंडावर पक्षातून बाहेर गेलेली अनेक मंडळीही पुन्हा पक्षात येण्यास सज्ज झाली आहेत.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात पुणे, साताऱ्यानंतर कोल्हापूर हा पक्षाचा बालेकिल्ला राहिला. मात्र, सत्तेचा वापर पक्षवाढीसाठी झाला नसल्याने पक्षाची ताकद वाढण्यापेक्षा दिवसेंदिवस कमी होत गेली. मागील पाच वर्षांत पक्ष सत्तेत नव्हता. भाजपने विविध पदे देऊन इतर पक्षांतून भरती प्रक्रिया सुरू केली.
ऐन लोकसभा व विधानसभेच्या तोंडावर मातब्बरांनी राष्ट्रवादीला रामराम केला. भाजपचा धडाका पाहता पुन्हा सत्ता येणे अशक्यच असे प्रत्येकाला वाटत होते, त्यामुळे पहिल्यांदा पक्ष कोण सोडते, यासाठी स्पर्धाच लागली होती. मात्र, अनपेक्षितपणे पक्ष सत्तेवर आला आणि गेली वर्षभर पक्ष सोडणाऱ्यांमध्ये अवस्थता पसरली.आता इतर पक्षांतूनही भरती सुरू झाली असून योगीराज गायकवाड यांच्यापाठोपाठ राजीव आवळे हेही पक्षात येत आहेत. त्याशिवाय इतरही रांगेत आहेत. आगामी तीन-चार महिन्यांत गोकुळ, जिल्हा बँकेची निवडणूक आहे. तत्पूर्वी सत्तेच्या लाटेवर स्वार होण्यासाठी दिग्गज पुन्हा पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. बेरजेच्या राजकारणात त्यांना पक्षात घेऊन सत्तेची फळेही चाखायला मिळतील, मात्र गेली वीस वर्षे पक्षात झोकून देऊन काम करणाऱ्यांचा पांग कधी फिटणार? असा सवाल निष्ठावंतून केला जात आहे.सत्तेची सूज वाढणारसत्तेत असणाऱ्या पक्षात नेत्यांसह कार्यकर्त्यांचा भरणा होतो. त्यामुळे पाच आपोआपच पक्षात सत्तेची सूज पाहावयास मिळते. मात्र, ही सूज फार काळ राहत नाही, सत्ता गेली की कधी उतरली हे पक्षनेतृत्वालाही कळत नाही.आवळेंचा मंगळवारी प्रवेशमाजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. ते मंगळवारी (दि. १०) आपल्या समर्थकांसह मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.