मुंबई – नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद पेटला आहे. या विमानतळाला शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे तर स्थानिक भूमिपुत्रांनी आणि संघटनांनी ज्येष्ठ नेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे. या नामकरणाच्या वादावरून नवी मुंबईत संघर्ष पेटला असताना यात मनसेनं उडी घेतली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव असेल असं तर्क सांगितला. सांताक्रुझ विमानतळाचं विस्तारीकरणाचा नवी मुंबई विमानतळ एक भाग असल्याचं ते म्हणाले. परंतु राज ठाकरेंच्या या तर्कावर शिवसेनेने पलटवार केला आहे. नवी मुंबई विमानतळ हे नवीन असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. राज ठाकरेंचा केवळ तर्क आहे. नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं. यामुळे खेदजनक आणि वाईट वाटतं असा टोला प्रवक्ते अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
त्याचसोबत ज्येष्ठे नेते दि. बा पाटील यांनी चांगलं काम केले यात वाद नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करू नये. या विमानतळाच्या नामकरणावर राजकारण बाजूला ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर नाव देण्याचा प्रश्नच नसता असा पलटवारही अरविंद सांवत यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
'मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,' असं राज ठाकरे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,' असं राज म्हणाले.