नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये ठिकठिकाणी पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. रॅलीचा मार्गसोडून काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला, तर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. पण यावरुन आता राजकारण तापू लागलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जिंकलेलं नाही हेच इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे" असं सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे. "पोलीस आम्हाला संपूर्ण सहकार्य करत होते आणि आहेत. पण काही आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि ते निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट केला गेला होता", असा आरोप टिकैत यांनी केला आहे.
"खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं", पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केलं आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीत आज जे घडलं ते धक्कादायक दृश्य होतं. ट्रॅक्टर रॅली दरम्यान समाजकंटकांनी केलेली हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनाला आजच्या घटनेने छेद गेला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी हिंसक घटनेपासून दूर ठेवलं आहे. ट्रॅक्टर रॅली स्थगित करण्यात आली आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं" अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
"दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार", बाळासाहेब थोरातांचा घणाघात
कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी 61 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरू असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची हटवादी, अहंकारीवृत्तीच जबाबदार असल्याचा आरोप महूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. "देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना प्रजेचा प्रमुख देशाच्या अन्नदात्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कायदे मागे घेण्याची शेतकऱ्यांची भूमिका असताना सरकार मात्र चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे. चर्चेच्या दहा फेऱ्यानंतरही सरकार कोणत्याच निर्णयापर्यंत आलेले नाही. उलट या आंदोलनाला खलिस्तानी म्हणून बदनाम करण्याचे काम केले गेले. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहिल्याने दिल्लीत आजची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. हे कायदे भांडवलदार, साठेबाजांच्या फायद्याचे आहेत. फक्त शेतकरीच नाही तर जनतेच्याही विरोधातील आहेत" असं थोरात यांनी म्हटलं आहे.