महाड : रायगड लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी प्रचारात मतदारसंघात वाटप केलेल्या ‘सिंहावलोकन’ या कार्य अहवालावर मुद्रक, प्रकाशकाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसल्याने ही निवडणूक आचारसंहितेच्या कायद्याचे उल्लंघन करणारी बाब असल्याने या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे या गंभीर बाबतीत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्र ार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी महाडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी नवाब मलिक हे महाड तालुक्यात आले होते. त्यावेळी सोमवारी सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन के ले होते. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या देशावर ४८ हजार कोटींचे कर्ज होते, मात्र आता हा कर्जाचा बोजा दुप्पट झाला असल्याचे मलिक यांनी सांगितले. देशातील मोदी सरकार हे अल्पसंख्याक आणि दलित विरोधात आहे. आमच्या राष्ट्रवादावर मोदी शंका व्यक्त करतात, मात्र आमचा राष्ट्रवाद हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला. सर्वात निष्क्रि य खासदार अशी ओळख असलेल्या अनंत गीते यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पद असूनही कोकणात एकही उद्योग आणू शकले नाहीत, त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे मलिक यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्याचे राजकीय भांडवल करणारे मोदी आपले मत शहिदांना समर्पित करण्याचे आवाहन करताना भाजपला मतदान करा असे सांगतात, हा शहिदांचा अपमान असल्याचे मलिक यांनी सांगितले. या निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोदी सरकारचा पराभव आता अटळ आहे असा ठाम विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार माणिक जगताप आदी उपस्थित होते.
गीतेंच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार, नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:11 AM