मुंबई : भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे की त्यांच्याकडे पक्षाची इतर जबाबदारी देण्यात येणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये. याबातचा निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारले. यावेळी, एकनाथ खडसे यांच्यासोबत काही संस्थेतील लोक पक्ष प्रवेश करतील. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील काही लोक प्रवेश करणार आहेत. सध्या एकनाथ खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये. याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील. कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरवू नका. या चर्चांना पूर्णविराम दिला तर बरं होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार थोडे आजारी आहेत. त्यांना सर्दीचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. कोरोना झाला आहे का, याबाबत नेमकी माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे, बाळासाहेब पाटील आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते.