मुंबई - गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यात चिपळूण शहराचा बहुतांश भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. तर मुंबईजवळील बदलापूर, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भाग जलमय झाला होता. कोल्हापूरमध्येही पुराचे संकट दिसून येत होते. मात्र राज्यात अशी आणीबाणीची परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (NCP leader busy partying Eid as Konkan sinks, angry reaction of netizens)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या फौजिया खान यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे हे उपस्थित होते. दरम्यान, स्नेहभोजन झाल्यानंतर फौजिया खान यांनी ट्विटरवर या स्नेहभोजनाचा फोटो शेअर केला होता. आता या फोटोवरच नेटिझन्सनी टीका सुरू केली आहे.
राज्यात पुरस्थिती निर्माण झाली असताना आणि कोकणातील चिपळूणमध्ये पुरामुळे आणीबाणी निर्माण झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते स्नेहभोजन करण्यात गुंतले असल्याने नेटिझन्स टीका करत आहेत. हे आहे अनुभवी सरकारच गांभीर्य, तिकडे पुरात लोकांना खायला अन्न नाही पण इकटे पार्ट्या चालू आहेत, अशी टीका काही नेटिझन्सनी केली आहे.
तर आज तिथे चिपळूणची परिस्थिती बघून इथे जेवण करायचं सुद्धा मन झालं नाही. अर्धा महाराष्ट्र आज पाण्याखाली आहे. चिपळूण, कोल्हापूरमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि इथे पार्टी वगैरे चालू. पावसामध्ये फक्त निवडणुकीमध्ये भिजायचं, बाकी दिवस जनतेला उगड्यावर सोडून द्यायचं, असा टोलाही एका युझरने लगावला आहे.