"माझ्या मागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन असं मी गंमतीनं म्हटलं होतं. तुमच्या मागे ईडी लागली तर असा प्रश्न जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना विचारला होता. तेव्हा माझ्यामागे ईडी लागल्यास सीडी लावणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता खरंच मागे ईडी लागली. पण आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं. गुरूवारी गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेचं आय़ोजन केलं होतं. रात्री उशीरा या सभेत बोलताना खडसे यांनी हे वक्तव्य केलं. "ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा जयंत पाटील यांनी तुमच्या मागे ईडी लागू शकते अशी शक्यता व्यक्त केली. त्यावर बोलताना मागे ईडी लागल्यास मी सीडी लावेन असं म्हटलं होतं. परंतु आता माझी प्रत्यक्षात ईडीची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचं काम करणार आहे," असं म्हणत खडसे यांनी भाजपला इशारा दिला. काय म्हणाले होते खडसे ?राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा गमच्या देऊन त्यांचे स्वागत केले. "मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही," असं आपलं दु:ख व्यक्त करताना खडसे म्हणाले. "मला जयंत पाटील यांनी विचारले होते की, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात तर तुमच्या मागे ईडीची चौकशी लावली जाईल. तेव्हा काय कराल? मी म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन," असंही ते म्हणाले होते.