"भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले तीच संसद आज द्वेषापाई बदलली जात आहे. त्याजागी नवीन संसद बनवली जात आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
"देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांशी आपल्याला पुढे सामना करायचा आहे. त्यामुळे आपण आपली संघटन मजबूत केली पाहिजे," असं आवाहनही पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार आहे. फुले-शाहू -आंबेडकरांच्या विचारांना गती देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. आपण अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
"अकोल्यात अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मला विश्वास आहे, की पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस चांगली कामगिरी करेल. महाराष्ट्रात हा आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. काँग्रेस, शिवसेना सोबत आहेतच. महाविकास आघाडीच्या नियमांना कोणताही धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस कशी मोठी होईल याचा प्रयत्न आम्ही करू," असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं.