नांदेड- सत्तेत आल्यास चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देणार असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्हाला मार्ग सांगा, आम्ही तो प्रश्न सोडवतो अशा शब्दात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त रविवारी नांदेडात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, फडणवीस म्हणतात सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार. म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. परंतु त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालविण्यास सक्षम आहोत. त्यांनी फक्त आम्हाला मार्ग सांगावा. फडणवीसांनी ओबींसीचे नेतृत्व घ्यावे असा सल्ला भूजबळांनी दिला आहे. त्यावर पाटील म्हणाले, भाजपाला आणि फडणवीसांना ऐवढाच कळवळा असता तर भूजबळांना एवढे वर्ष तुरुंगात खितपत ठेवले नसते. त्यांचे त्या काळात अतोनात हाल केले. एकनाथ खडसे सारख्या नेत्याला त्रास देवून पक्ष सोडण्यास मजबूर केले. त्यामुळे आता ओबीसीसाठी आंदोलन करणे हे हास्यापद असल्याची टिका पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जयसिंगराव गायकवाड, डॉ.सुनिल कदम यांची उपस्थिती होती.सीबीआय, ईडी आणि आता आरबीआयचा वापरमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने आतापर्यंत सीबीआय, ईडी आणि आरबीयआयचा वापर करणे सुरु केले आहे. आरबीआयने सहकारी बँकामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना संचालक होता येणार नसल्याची नियमावली केली आहे. त्यामुळे चांगल्या चालत असलेल्या संस्था बंद करण्याचा हा उद्योग आहे. असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.आंदोलने करु नयेतडेल्टा प्लसचा धोका वाढला आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. काँग्रेसकडून ओबीसीसाठी आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी गर्दी होत आहे. या विषयावर पाटील म्हणाले, डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे यापुढे कुणीही अशाप्रकारची आंदोलन करु नयेत असे मत व्यक्त केले.
सत्तेत येऊ नका, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 12:14 PM