मुंबई: भाजपचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एक कलमी कार्यक्रम हे नेते राबवत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. बुधवारी नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. (NCP leader Nawab Malik slams BJP, said Maharashtra government stable and strong)
कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यामुळे जनता संतुष्ट आहे. मात्र भाजपाचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
याचबरोबर, इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये, या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे भाजपा नेणेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे आघाडीला कसलाही धोका नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यामुळे तर्कविर्तकांच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर दुसरीकडे लवकरच भाजपा सत्तेत येणार असल्याची विधाने भाजपा नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी हे भाष्य केले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचे सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचे लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेले तर बघू, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली.