मुंबई : ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही, तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, बाबा रामदेव यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे नवाब मलिक म्हणाले. (NCP leader Nawab Malik Targets Ramdev Baba Over His Comments On Medical Therapy)
केंद्रीय आरोग्य विभागाने बाबा रामदेव यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पद्धतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनवण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
("भविष्यवाणी खरी ठरत नसल्यामुळे भाजपा नेते हताश, त्यामुळेच तारीख पे तारीख…", नवाब मलिकांचा टोला)
याचबरोबर, बाबा रामदेव डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच, देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास...अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात. त्यापेक्षा दुर्दैवी घटना होऊ शकत नाही, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते बाबा रामदेव?गेल्या काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नही अलोपॅथीला विचारले होते. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते. बाबा रामदेव यांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी असे त्यांना सुनावले होते. पण, बाबा रामदेव यांनी डॉक्टरांवर पुन्हा टीका केली होती.
बाबा रामदेव यांच्याविरोधात 1 हजार कोटींचा मानहानीचा दावाइंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील एक नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना धाडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीचे 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर बाबा रामदेव यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर निशाणा साधला आहे.