पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?
By कुणाल गवाणकर | Published: December 27, 2020 12:59 PM2020-12-27T12:59:15+5:302020-12-27T16:41:39+5:30
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघातून संधी मिळण्याची शक्यता
पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळू शकते. तशी मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली आहे. २०१९ मध्ये पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामं लवकर होतील. त्यामुळे पार्थ यांना संधी दिली जावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे. भालके यांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. मात्र भालकेंच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल भाष्य करणं त्यांनी टाळलं. त्यामुळे पंढरपूरमध्ये कोणाला संधी मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.
पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक विरोधात जाणार नाहीत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असं या गटाला वाटतं. भारत भालकेंच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.