मुंबई : शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण कोकणाला या सरकारने काय दिलं? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे. पण सरकार दिसतंय कुठे? असा असा सवाल करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी 'राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला' असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात,' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. “राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा,” असं ट्विट करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश भाजपाची कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन चौफेर टीका केली. तसेच, कोरोना संकटात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे, एकही घरी बसलेला नाही असा अप्रत्यक्ष टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. या मंत्र्यांना झोप कशी लागते. राज्यात फक्त एकच धंदा सुरु आहे, तो म्हणजे बदल्यांचा धंदा. प्रेताच्या टाळूवरचं लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला.
'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला'शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण कोकणाला या सरकारने काय दिलं? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? पिकेल ते विकेल काय करता? मागच्या वर्षी पिकलं ते खरेदी केलं नाही आणि काय वल्गना करता? आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते ते आता कुठे गायब झालेत? लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.