धनंजय मुंडेंवरच हा प्रश्न सोडला पाहिजे. कारण तो त्यांचा व्यक्तीगत, कौटुंबीक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेण्यासाठी प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावा काय नाही याचा त्यांना जास्त अनुभव आहे, असे सुतोवाच शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
पोलिसांनी बलात्काराची तक्रार दाखल करून घेतली नाही यावर मी काहीही बोलू शकत नाही. हा राजकीय विषय नाही. राजकीय विषयावर आरोप प्रत्यारोप ठीक आहेत. हा कौटुंबीक विषय आहे. एखाद्यावर वैयक्तीक टीका केल्यास त्याचे आयुष्य, कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. यामुळे राजकीय नेत्यांनी एकामेकांवर असले आरोप करू नयेत. राज्य सरकार अडचणीत येईल हा विरोधकांचा भ्रम आहे, असेही राऊत म्हणाले.
शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन कोणतीही मागणी केली नाही. त्यांनी सरकराकडे मागणी केली आहे. न्यायपालिका कायदे बनवत नाही. केंद्र सरकार बनवते. न्यायालयाने बनविलेली कमिटी ही प्रो कायद्यांची आहे. केंद्राने कायदे मागे घेतले तर काही सरकार पडेल असे होणार नाही. मोठे बहुमत आहे. मात्र, या समितीकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत नाहीय. शेतकऱ्यांसाठी माघार घेतली तर केंद्र सरकारची प्रतिमा तळपून निघेल, असे राऊत म्हणाले.
भाजपाला गोड शुभेच्छा...भाजपा जरी विरोधी पक्ष असला तरीही आम्ही त्यांना विरोधक मानायला तयार नाही. राजकारणात कोणीही कायमचा मित्र, शत्रू नसतो. राजकारणात विरोधी असले तरीही आमचे ते सहकारी आहेत. यामुळे त्यांनी गोड रहावे, गोड हसावे, सरकारच्या बाबतीत गोड विचार करावा, राज्याला गोड दिवस दाखवावेत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपाला मकर सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.