सिडकोच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; अजित पवारांनी अंग काढून घेतल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:14 AM2021-06-13T06:14:19+5:302021-06-13T06:14:47+5:30
नवी मुंबईच्या निवडणुकीवर डोळा, की राजकीय पुनर्वसनाला प्राधान्य? ठाण्यातून नजीब मुल्ला, कर्जतचे आमदार सुरेश लाड अशी वेगवेगळी नावे सध्या चर्चेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई/उरण : आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळ म्हणून ओळखल्या जाणारे सिडको महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येईल असे गृहीत धरून त्यासाठी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत.
ठाण्यातून नजीब मुल्ला, कर्जतचे आमदार सुरेश लाड अशी वेगवेगळी नावे सध्या चर्चेत आहेत. यापूर्वी हे महामंडळ सांभाळलेल्या प्रमोद हिंदुराव यांना पुन्हा संधी हवी आहे. इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडीतून अंग काढून घेतल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार नेमकी कोणाची निवड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय पुनर्वसन की नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वरचष्मा असलेल्या नेत्याची निवड यातील कशाला प्राधान्य दिले जाते, ते लवकरच स्पष्ट होईल.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाआघाडी सरकार अस्तित्वात आले तेव्हाच तिन्ही पक्षांत महामंडळाचे वाटप झाल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यावरील नियुक्त्या लवकर केल्या जाव्या यासाठी नुकतीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच नियुक्त्या होतील असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या नेत्यांपैकी एखाद्याला संधी दिली जाते,की पुण्यातून कोणाला संधी दिली जाते यावरही पक्षात चर्चा झडत आहेत.
भाई जगताप यांचे काँग्रेसकडून नाव?
आम्ही नेहमी दुय्यम भूमिकेत का रहायचे, म्हाडा किंवा सिडको आमच्या वाट्याला का नको, अशी भूमिका घेत काँग्रेसच्या काही नेत्यांनी सिडकोचे अध्यक्षपद आपल्या पक्षाला मिळावे अशी मागणी केली होती. त्यासाठी भाई जगताप यांचे नावही पुढे केले होते. मात्र जगताप यांच्याकडे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद असल्याने आणि त्या निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याने पक्षातून त्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. तसेच तिन्ही पक्षांच्या वाटणीत हे महामंडळ नेमके कोणाला दिले जाईल यावरही पक्षनेत्यांनी काहीही सांगितलेले नाही.