सोलापूर: रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश, शरद पवारांनी घेतलेली माघार यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा तिढा निर्माण झाला होता. मात्र हा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. माढ्यातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाच्या मदतीनं सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शिंदे आज राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. सुरुवातीला माढ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव चर्चेत होतं. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्यानं शरद पवार यांनी माघार घेतली. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी नको, असं म्हणत पवारांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. सध्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेत माढ्याचं प्रतिनिधीत्व करतात. विजयसिंह यांचे पुत्र राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र उमेदवारी मिळण्याची फारशी शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
माढ्याचा तिढा सुटणार? राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:03 PM