नाशिक – अहमदनगरच्या पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं प्रकरण अलीकडेच निवळलं असताना सिन्नरमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटेच्या मदतीनं शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी निवडून आले आहेत. कोकाटे यांच्या १० समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केली आहे.
पारनेरच्या घटनेने शिवसेना आणि राष्ट्रवादीत बेबनाव असल्याचं समोर आलं, त्यानंतर महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. त्यानंतर या नाट्यावर पडदा टाकत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवण्यात आले, त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीत यांच्यातील वाद मिटला. पण आता सिन्नर नगरपरिषदेच्या घटनेने पुन्हा एकदा दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. (Shivena-NCP)
सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. नगरपरिषदेत नगराध्यक्षासह शिवसेनेचे १९ नगरसेवक असतानाही उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना १५ मते मिळाली तर तर शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर यांना १४ मते मिळाली.
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या १० समर्थक नगरसेवकांनी या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना मतदान केले, त्यासोबत ऐन निवडणुकीत शिवसेनेचे ५ नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केले, त्यामुळे बाळासाहेब उगले हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेने पक्षाच्या नगरसेवकांना प्रणाली गोळेसर यांना मतदान करण्यासाठी व्हीप बजावला होता. परंतु काहींनी बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात मतदान केल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करु अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांनी दिली आहे.(Shivena-NCP)
काय घडलं होतं पारनेरमध्ये?
पारनेरमध्ये शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर शिवसेनेने यावर नाराजी व्यक्त केली होती, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादीने पुन्हा या नगरसेवकांना शिवसेनेत पाठवले, मात्र या संपूर्ण घडामोडींवर विरोधकांनी महाविकास आघाडीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार सुरु आहे असं टीकास्त्र सोडलं होतं.
कोण आहेत माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे यापूर्वी भाजपात होते, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्यासोबत ज्यावेळी अजित पवार यांनी भाजपासोबत सलगी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, त्यावेळी काही आमदार गायब असल्याची चर्चा होती, त्यात माणिकराव कोकाटे यांचेही नाव घेतले जात होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पतीला खांद्यावर बसवून गावकऱ्यांनी काढली महिलेची धिंड; अफेअरच्या संशयातून तालिबानी शिक्षा
शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन
तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच
चोराच्या उलट्या बोंबा! नेपाळ सरकारनं सीमेवरील घुसखोरीला सांगितलं वैध; ‘हा’ तर आमचाच भाग मग...
व्हायरल होणाऱ्या 'ब्लॅक पँथर'च्या फोटोमागची कहाणी; ती २० मिनिटं कशी होती? फोटोग्राफरनं सांगितलं...