मुंबई – राज्याच्या राजकारणात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार आहोत असं विधान करुन चर्चेला उधाण आणलं आहे. भाजपा पदाधिकारी बैठकीत बोलत असताना ते म्हणाले की, भविष्यात शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्याबाबत केंद्रीय नेतृत्व विचार करेल पण येणाऱ्या सर्व निवडणुका वेगळ्या लढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मात्र चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे अनेकांनी यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आजही शिवसेनेसोबत जाण्यात तयार असल्याचं भाजपातील मोठे नेते म्हणाले, सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता गेल्या ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवलेले अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणत शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! असा सूचक इशारा देत आतातरी राजकारण थांबवा असा टोला लगावला आहे.
भाजपातील पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षात डावललं जात असल्यानं नाराज असल्याचं वारंवार बोललं जातं, मधल्या काळात हे नेते शिवसेना, राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशाही चर्चा सुरु होत्या. त्यामुळे आमदार रोहित पवारांचं सूचक विधान भाजपाच्या कोणत्या नेत्यांबद्दल आहे हे गुपितच आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल केलेलं विधान देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलं होतं. 'चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत जे बोलले, ते त्यांनी एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडूनही आम्हाला प्रस्ताव मिळालेला नाही,' असं फडणवीस म्हणाले होते. तर भाजपाची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित आहे, या भ्रमात भाजपा नेत्यांनी राहू नये. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजाराचे रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा जसा गोंधळ उडतो तसा तो उडालेला दिसत आहे. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वत:च केलेल्या गुंत्यात फसू नये असा टोला शिवसेनेकडून भाजपा नेत्यांना लगावण्यात आला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चीनने नेपाळच्या दिशेनं टाकलं आणखी एक पाऊल; भारताला लागली धोक्याची चाहूल
“नरेंद्र मोदी पहिल्यांदा हिंदू आहेत मग देशाचे पंतप्रधान; औवेसी यांनी राम नामाचा जप करावा”
Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड
अयोध्येत उत्साह शिगेला; भूमीपूजनाच्या दिवशी प्रभू रामाला हिरव्या रंगाचा पोशाख घालणार, कारण...
‘मॉडर्ना’च्या कोरोना लस चाचणीला मोठं यश; व्हायरसचं खात्मा होणार अन् संसर्गही रोखणार