मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप लावल्यापासून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. हे सगळ्याच पक्षांना माहिती आहे परंतु मी एकटा बोललो. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार हवाय. जातीपातीच्या राजकारणातून आपण बाहेर पडलं पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केले होते.
राज ठाकरेंच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आमदार रोहित पवारांनी ट्विट करुन यावर भाष्य केले आहे. रोहित पवार(NCP Rohit Pawar) म्हणतात की, साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ...'च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो असं त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंसह भाजपालाही चिमटा काढला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी ’छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांनी न होता शाहू-फुले-आंबेडकर यांनी कशी होते? तुम्ही यांचा विचार घेऊन पुढे जाणार, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार घेऊन का पुढे जात नाही असा सवाल ठाकरे यांनी राष्ट्रवादीसमोर उपस्थित केला.
शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे
‘पवारांनी मला मोजत बसू नये’
“महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे, यासाठी मी ‘ते’ विधान केले होते. यात माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. ‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का, हा प्रश्न कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा प्रश्न ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. “मी काय वाचलंय हे मला माहिती आहे. उगाच मला मोजायचा प्रयत्न करू नये. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल, या शब्दांत ठाकरे यांनी फटकारले.