पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा, नितीन राऊतांना शिवसेनेचा विरोध; संग्राम थोपटे होणार विधानसभा अध्यक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:21 AM2021-02-12T05:21:59+5:302021-02-12T07:14:06+5:30
विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या सहमतीने नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले होते. त्यामुळे पद कॉँग्रेसकडेच राहील.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी व शिवसेनेची परीक्षा पास करावी लागत आहे.
विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या सहमतीने नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले होते. त्यामुळे पद कॉँग्रेसकडेच राहील. पण त्यासाठी मित्रपक्षांना विश्वासात घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होती. संसदीय कामकाजाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. परंतु कॉँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांचा चव्हाण त्यांना विरोध आहे. दुसरे नाव नितीन राऊत यांचे आहे. राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला मी सोनिया गांधी यांच्याकडे गेलो होतो. मला उपमुख्यमंत्री करण्यावर विचार सुरू आहे.
एका नावावर सहमती शक्य
राऊत यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने आम्हाला राऊत चालणार नाही, अशी माहिती दिली. राऊत नाही तर कोण? यावर या नेत्याने भोरचे आमदार संग्राम थोपटे हे दोन्ही मित्रपक्षांना चालू शकतात, असे संकेत दिले.