मुंबई – राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच पडला असेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र नाही. त्यातच काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची भूमिका वारंवार मांडत आहे. तर शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी(NCP) दोन्ही पक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे.
यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राजकीय खळबळ माजवली आहे. या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करावी त्यातच शिवसेनेला फायदा आहे असं म्हटलं आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे शरद पवारांची(Sharad Pawar) दिल्लावारी नेमकी कशासाठी आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दुपारी विमानाने शरद पवार दिल्लीला रवाना झाले, सायंकाळी ते दिल्लीत पोहचले आहेत. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शरद पवार दिल्लीला गेले आहेत. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) भेटीनंतर पवारांचा दिल्लीदौरा होत आहे. पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. केरळमधील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत पवारांची नियोजित भेट होती त्यासाठी ते दिल्लीत गेले असं सांगितलं जात असलं तरी राज्यातील राजकारणात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार दिसत असलं तरी सरकारमध्ये खूप घडामोडी घडत आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. परंतु यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० मिनिटं वैयक्तिक भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही असं म्हणत इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याचा दाखला शरद पवारांनी दिला भाजपासोबत शिवसेना जाणार की राष्ट्रवादी यावरही राजकीय चर्चा सुरू आहे. शरद पवार दिल्लीत किती दिवस असणार याबाबत स्पष्टता नाही. या दिल्ली दौऱ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार का? हेदेखील अद्याप कळालं नाही.
प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?
आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.
सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.