मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले होते. त्यावर आता राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत, आयकर विभागानं छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला होता. अल जेब्रिया कोर्टा संदर्भात किरीट सोमय्यांनी ट्विट करत भुजबळांवर हे आरोप केले आहेत. पण, या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारात भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नसल्याचें स्पष्ट केलं, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी दिली.
तसेच, भाजपाचे नेते सतत असे बिनबुडाचे आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावं परंतु, वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचं कटकारस्थान ताबडतोब थांबवावं, असा इशाराही तापसे यांनी यावेळी दिला.