मुंबई - अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी ज्यो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. "अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे" असं ट्विट केलं आहे.
अमेरिकेप्रमाणेच बिहारच्या निकालातही असाच बदल दिसेल अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत मिळत असून एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव सर्वात पुढे पाहायला मिळत आहेत. त्यावर देखील रोहित यांनी ट्विट केलं आहे. राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय असं म्हटलं आहे. "बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा" असं म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी डेमोक्रॅटिक पार्टीच्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा अमेरिकेत भरपूर गाजली होती. ज्यो बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही ज्यो बायडन यांनी जोरदार भाषण केलं. ज्यो बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे ज्यो बायडन यांच्या सभेवर भाष्य केलं होतं.
"जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो. पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. 2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे" असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. काही नेटकऱ्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 12 वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली. त्यांनी त्याची तुलना करताना बायडन त्या विजयाची पुनरावृत्ती करतील असा विश्वासही व्यक्त केला होता.