मुंबई - प्रश्नम यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात 67 टक्के लोकसंख्या असलेली 13 राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यासाठी सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असून, त्यांना पुन्हा मतदान करू असे म्हटले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश असल्याचं देखील म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.
"'प्रश्नम' या संस्थेने देशातील 13 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे #मविआ सरकारचं यश आहे" असं म्हटलं आहे. तसेच ठाकरे सरकारवर होत असलेल्या टीकेवरून भाजपाला सणसणीत टोला देखील लगावला आहे. "उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपाला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपाकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरू नये!" असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी पेट्रोलवर (Petrol) लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी पुण्यामध्ये केलं होतं. यावरून रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता. "खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे" असं म्हणत रोहित पवार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. तसेच दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही असंही म्हटलं होतं. रोहित यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करून भाजपाची चांगलीच पोलखोल केली होती.
"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय"
"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपाकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही" असं म्हटलं होतं. "केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रु मिळत असल्याचे सांगतात" असं रोहित यांनी म्हटलं होतं. तसेच "विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही" असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.