मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्वारंटाईन व्हावे, असा सल्लाही दिला आहे. ट्विटरवरून फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना सदिच्छा दिल्या आहे. मात्र एका युजरने फडणवीस कोरोना झाल्याचं नाटक करताहेत असं म्हटलं होतं. त्याला आता रोहित पवारांनी सुनावलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळे त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजपा हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत" असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. याआधी "देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या, आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत" असं म्हटलं होतं.
"कोरोना वगैरे काही नाही, बिहारमध्ये भाजपा १०० टक्के हरणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फोडू नये म्हणून हे कोरोनाचं नाटक, बाकी काही नाही दादा..." असं ट्विट एका युजरने केलं होतं. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेक नेते कोरोनावर मात करून परतले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याशी बोलताना कोरोनाची लागण झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल करा, असं म्हटलं होतं. फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होतं.