पुणे – गेले काही दिवसांपासून पुण्यात भाजपाच्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे नवं शिल्पकार, विकासपुरूष असं संबोधण्यात आलं आहे. परंतु ज्यांनी पुण्यासाठी काहीच केले नाही त्यांचे बॅनर भाजपा झळकवतंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.(Banner War Between NCP & BJP in Pune)
आमदार रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले की, पुण्यात जे बोर्ड वॉर चाललं आहे. ज्या व्यक्तीनं पुण्यासाठी काही केलंच नाही अशा व्यक्तीचे बॅनर भाजपानं पुण्याचे शिल्पकार म्हणून झळकावले आहेत. पण पुण्यातील ज्या प्रमुख इमारती आहेत. जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून या महत्त्वाच्या इमारतींचा यात समावेश आहे. त्या इमारतींचं काम सुरू असताना अजितदादा तेथे सकाळी ६ वाजता भेट द्यायचे, त्याठिकाणी पाणी निट मारलंय का? व्यवस्थित काम होतंय का? याचा आढावा घ्यायचे. सकाळी जिल्हाधिकारी इतर अधिकारी उपस्थित व्हायचे. उपमुख्यमंत्री, मंत्री असतानाही एवढ्या बारकाईनं त्यांनी पुण्यात काम केले आहे. फंड आणला म्हणून काम संपलं असं होत नाही तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन ते माहिती घ्यायचे असं त्यांनी सांगितले.
फडणवीस विरुद्ध पवार 'होर्डिंग'युद्ध
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत आहे. हा योगायोग असला तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मात्र ऐकतील ते कार्यकर्ते कसे? पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिले. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार 'पोस्टरबाजी' करण्यात आली.
पुणे शहर भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा 'विकासपुरुष' ‘पुण्याचे नवे शिल्पकार’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावले आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. अजित पवारांचे 'कारभारी लयभारी' असा उल्लेख फ्लेक्स सगळीकडे लावण्यात आले आहे. या निमित्ताने या शहरात झळकत असलेल्या फ्लेक्सचा चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांमधील 'पोस्टर युद्ध' आणखी वाढत जाणार असल्याची शक्यता आहे. पुणेरी पाट्यांप्रमाणे पुण्यातील राजकीय बॅनरवरील स्लॉगन्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.