मुंबई – महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर चिखलफेक करणाऱ्यांनो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपाला लगावला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे तपास सोपवल्यानंतर भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मुन्ना यादवसारख्या गुंडाला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे अशी आठवण करुन देते म्हणत चाकणकर यांनी भाजपा नेत्यांना चिमटा काढला आहे.
सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या कोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, 'या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी चांगला तपास केला. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, तसेच त्यामध्ये कुठलाही दोष आढळून आला नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये संघराज्य संकल्पना आहे. मात्र आता त्या रचनेबाबत घटनातज्ज्ञांनी, विचारवंतांनी विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. सीबीआय तपासाची शिफारस करणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्याच्या परवानगीनंतर सीबीआयकडे तपास सोपवला जातो. मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आम्ही सीबीआला पूर्ण सहकार्य करू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
विरोधकांची सरकारवर टीका, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपानं निवडणूक प्रभारी केले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांना टार्गेट केलं होतं. माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमय्या यांनी ही मागणी केली होती.