मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. एका गुजराती वर्तमानपत्राने यांच्यामध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या. यासंदर्भात आता शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी माहिती दिली आहे. "आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही" असं राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी संजय राऊत यांनी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. पण, गुप्त काहीच राहत नसतं, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, सार्वजनिक होतात असं म्हटलं होतं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. देशात महाराष्ट्राचं नाव खराब झालंय, या घटनांवरुन सध्या महाराष्ट्र बदनाम झालाय, जे व्हायला नको. महाराष्ट्राला देशात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. माझं कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नव्हता. सरकारमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं काम उत्तम सुरू आहे. फक्त, विरोधकांकडून जे वातावरण निर्माण केलं जातंय, ते करुन देण्याची संधी विरोधकांना देऊ नये, हेच मला सांगायचं होतं, असे रोखठोक स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय. तसेच, महाविकास आघाडी सरकार स्थिर असून पुढील साडेतीन वर्षे विरोधकांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत, असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला.
ही निव्वळ अफवा - नवाब मलिक
शरद पवार आणि अमित शहा यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी स्पष्ट केले. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही.