मुंबई: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता पक्षांच्या मोर्चेबांधणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. अनेक नेते आता पक्ष सोडण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात भाजपपासून झाली असून, गोवा आणि उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पाच पैकी तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असून, शरद पवार स्वतः उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहे. तर मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर निवडणुका लढवणार आहे. तसेच गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणार उतरणार आहे.
गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न
गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. गोव्यातील भाजप सरकार हटवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. गोव्यात मंत्री आणि आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत काँग्रेसला जनतेला पाठिंबा मिळाला होता. मात्र, भाजपने सत्ता स्थापन केली. आता भाजपमध्ये जे आमदार, मंत्री आहेत, ते काँग्रेसमधून आले आहेत. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होईल
उत्तर प्रदेशात जनतेला बदल हवा आहे. या निवडणूकीत जनता उत्तर प्रदेशात बदल घडवून आणेल याचा विश्वास आहे. उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेले सरकार बाजूला सारणे महत्त्वाचे आहे. देशात सर्वधर्मसमभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करावेच लागेल, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात तर गोव्यात एका टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यातील मतदान १४ फेब्रुवारी होणार असून, सर्वच राज्यांतील मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.