मुंबई – शेतकरी आंदोलनावर परदेशातून पॉपस्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर देशात अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरपासून अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर भाष्य करत #IndiaTogether अशा हॅशटॅगने ट्विट केले. त्यावरून विरोधकांनी या सेलिब्रिटींवर जोरदार टीका केली, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला खोचक सल्ला दिला होता. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली होती.
सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कुस्ती काय असते हे शरद पवारांनी निवडणुकीत दाखवून दिलं आहे. तुमचा मुलगा जिल्हा परिषदेत पडला, कोणाच्या बाबतीत काय बोलावं हे समजत नाही. शरद पवारांबाबत बोलताना त्याचं भान ठेवलं पाहिजे. पवारांच्या कारकिर्दित क्रिकेटमध्ये २०-२० सामने सुरू झाले, वर्ल्ड कप सुरू झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तर गाव पातळीवर खेळले आहेत असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी लगावला.
तसेच तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, तिथले पवारसाहेब संस्थापक आहेत. या वयात त्यांनी कुस्ती खेळणं सदाभाऊंना अपेक्षित आहेत का? सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, कोणाच्या बाबतीत काय बोलावं ते त्यांना समजत नाही. ते काहीही बोलू शकतात असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे, टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला होता. शरद पवार यांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही. ते कधी हिंद केसरी झाले होते का, ही माहिती मी जुन्या लोकांकडून घेतली, तर त्यांनीही नाही म्हणून सांगितले. लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळले असतील ते सोडा. पण तरीही ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले ना असं सांगत पवारांनी सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला होता.
त्याचसोबत मी सोडून बाकीच्यांना काही कळत नाही, अशी कमी लेखण्याची पद्धत काही मंडळींनी अनुभवातून दिर्घकाळ एखाद्या क्षेत्रात असल्याने सगळेच अधिकार मला मिळाले आहेत, ही मानसिकता राज्यात उभारतेय हे बरोबर नाही, हे नवं नेतृत्वासाठी हानीकारक आहे असं मला वाटतं अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली होती.