नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती शनिवारी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी दिली आहे.
याआधी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील अकाली दलाच्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अन्न व प्रक्रिया मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. यानंतर संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांवरून सरकारला विरोध केल्यामुळे अकाली दल आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोन्ही पक्षांमधील युती संपुष्टात आली. शिवसेनेनंतर आता दुसऱ्या सर्वात जुना घटक पक्ष भाजपाने गमावला. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का आहे.
भाजपा आणि अकाली दल यांची ही युती दोन दशकांहून जास्त जुनी होती. १९९२ सालापर्यंत पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी ते पुढे आले होते. दरम्यान, अकाली दल केवळ एनडीएमधील सर्वात जुन्या घटक पक्षांपैकी एक नव्हता, तर तो एनडीएमधील सर्वात जुना पक्ष होता.
भाजपा आणि अकाली दल हे १९९६ मध्ये अकाली दलाच्या मोगा डेक्लरेशन नावाच्या एका करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एकत्र आले होते. त्यानंतर, दोन्ही पक्षांनी पहिल्यांना १९९७ मध्ये मिळून निवडणूक लढविली. तेव्हापासून भाजपा आणि अकाली दलाची युती होती. मोगा डेक्लरेशन हा एक सामंजस्य करार होता. त्यामध्ये पंजाबी ओळख, परस्पर बंधुता आणि राष्ट्रीय सुरक्षा या दृष्टिकोनाविषयी तीन मुख्य गोष्टींवर जोर देण्यात आला होता. दरम्यान, १९८४ सालानंतर पंजाबमधील वातावरण खूपच वाईट बनले होते, अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी या मूल्यांशी हातमिळवणी केली होती.
राजकीय विश्लेषकांनी या युतीकडे असे पाहिले होते की, त्यावेळी अकाली दल संपूर्ण शीख समाजाला एकत्र करू शकत नव्हता. शीख समाज फूट पाडून मतदान करत होता. अशा परिस्थितीत अकाली दलाला भाजपा हा एक सहयोगी पक्ष पाहिला, जो आपल्या वोटबँकेला धक्का न लावता ते वाढविण्याचे काम करेल आणि दुसरा इतर कोणताही पक्ष त्यांना मिळाला नाही. कारण, १९८४ च्या दंगलीनंतर जे घडले, त्यामुळे काँग्रेसला अशा आघाडीसाठी अयोग्य ठरविले. त्यामुळे अकाली दलाने भाजपाशी युती केली.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाबरोबर झालेल्या युतीचा फायदा अकाली दलालाही झाला. पंजाबमध्ये एकच पक्ष आहे, जो गेल्या काही दशकांत सलग दोन निवडणुका जिंकू शकला आहे. आणि ती म्हणजे भाजपा आणि अकाली दलाची युती. ही युती पंजाबमध्ये २००७ ते २०१७ पर्यंत सत्तेत राहिली. या युतीचे दिवस नेहमीच चांगले राहिले नाहीत. बर्याच वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा दोन्ही पक्षांची युती तुटली नव्हती. पण, अखेर संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांयावरून अकाली दलाने केंद्रातील एनडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
आणखी बातम्या...
- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा
- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"
- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात
- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु