नवीन कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. ते मागे घ्यायलाच हवेत -राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 03:14 AM2021-01-28T03:14:25+5:302021-01-28T03:14:50+5:30
काँग्रेस पक्षाने नव्या कृषी कायद्यांविरोधात पहिल्यापासून विरोधी भूमिका घेतली आहे.
नवी दिल्ली : नवीन कृषी कायदे मोदी सरकारने त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केली आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नवीन कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. ते मागे घ्यायलाच हवेत.
काँग्रेस पक्षाने नव्या कृषी कायद्यांविरोधात पहिल्यापासून विरोधी भूमिका घेतली आहे. पंजाबमध्ये राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला होता. या कायद्यांविरोधात काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेतही जोरदार आवाज उठविला होता. मात्र, हे कायदे अतिशय योग्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाम मत आहे.
अमित शहा यांनी घेतला स्थितीचा आढावा
दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील कायदा - सुव्यवस्थेच्या स्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला व त्या खात्याचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीत शांतता राखण्यासाठी तेथील पोलिसांच्या मदतीला साडेचार हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.