गेल्या आठवड्यात कर्नाटक आणि बेळगावचे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले होते. भाजपाचे नेते आणि बेळगावच्या पालकमंत्री असलेले रमेश जारकीहोळी यांची नोकरी देण्यासाठी तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता (Karnataka Sex For Job Case) . यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. (Dinesh kalhalli withdraw police case against BJP MLA ramesh Jarkiholi)
ही 'सेक्स फॉर जॉब'ची क्लिप समाजमाध्यमांमध्ये व्हाय़रल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी कब्बन पार्क पोलीस ठाण्यात जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर भाजपाचे काही आमदारही धास्तावले होते. त्यांचीही नावे यामध्ये येत होती. या प्रकरणाला रविवारी वेगळे वळण लागले आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे जारकीहोळी यांच्यासाठी धावून आले आहेत. कुमारस्वामींनी दिनेश यांच्यावर या प्रकरणी ५ कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
यावर सामाजिक कार्यकर्ते दिनेश यांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. कुमारस्वामी यांनी याप्रकरणी ५ कोटींचा व्यवहार झाला असल्याचा आरोप केला. त्यामुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे, असे स्पष्टीकरण दिनेश कलहळ्ळी यांनी कन्नड वृत्त वाहिन्यांशी बोलताना दिले आहे. लोक मला फोन करून प्रश्न विचारत आहेत. मंगळुरू ते बिदरपर्यन्त अनेकांचे मला फोन येताहेत. कुमार स्वामी यांच्या आरोपानंतर माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे केले आहेत. आता मी चौकात मोकळेपणाने फिरू शकत नाही. सगळेजण मला संशयाच्या नजरेतून पाहात आहेत म्हणून मी वकिलांचा सल्ला घेऊन तक्रार मागे घेतली आहे.
पीडित मुलीचे कुटुंबीय येऊन भेटलेले...माध्यमांना मी सीडी किंवा व्हीडिओ दिला नव्हता, तर तो व्हिडिओ आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मला संपर्क केल्याने मी कब्बन पार्क पोलिसात तक्रार दिली होती, असेही दिनेश यांनी स्पष्ट केले. कुमारस्वामी यांच्या आरोपावर याप्रकरणी ५ कोटींचा व्यवहार झाला, यावर तपास होणे गरजेचे आहे, असे मत दिनेश कलहळ्ळी यांनी व्यक्त केले आहे.